पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भेट घेतली. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, 45 वर्षापासूनचा माझा आणि गिरीश बापटांचा एक कार्यकर्ता म्हणून संबंध होता. ज्या काळात भाजपाला कठीण काळ होता त्यावेळेस काम केलेल्या आम्ही दोघे आहोत. हे सर्व त्याने मेहनतीमधून तयार केलेले आहे. सच्चा मित्र गमावल्याचे दुःख आहे. सातत्याने काही ना काही काम करून दिल्लीत येते होते. दिल्लीत माझ्या घरी राहायचे. मी त्याला जेवायचा सुद्धा आग्रह करायचो, असे गडकरी यांनी बोलताना सांगितले.
प्रामाणिक नेत्याला महाराष्ट्र मुकला: मी त्याला एक दोन वेळेस असेही म्हणले की तब्येत सांभाळ, तो म्हणायचा माझी तब्येत व्यवस्थित आहे. मधल्या काळामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेट झाली होती. साधारण डॉक्टर वगैरे बदलावा अशी इच्छा सुद्धा मी व्यक्त केली होती. परंतु नियतीने घाला घातला. एक सच्चा प्रामाणिक नेत्याला महाराष्ट्र मुकला, अशा भावना नितीन गडकरी यांनी गिरीश बापट यांच्याबद्दल व्यक्त केली..
सगळ्यांशी उत्तम संबंध: आणीबाणीच्या नंतर भाजपाला प्रतिकूल काळ होता. त्याच काळात मी आणि गिरीश बापट दोघांनी भाजपामध्ये काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणात ज्या व्यक्तीने मेहनत करून, परिश्रम करून भाजपाचा विस्तार केला. त्यात ही गिरीश बापटही होते. पुण्यामध्ये एका पिढीने जनसंघ आणि भाजपाचे काम वाढवले. ज्या कार्यकर्त्यांनी मोठे काम केले त्यामध्ये गिरीश बापटांचा सहभाग होता. सर्व प्रकारचे कार्यकर्ते आणि सर्व प्रकारच्या लोकांशी संपर्क ही गिरीश बापट यांची शक्ती होती. सगळ्यांशी उत्तम संबंध, विचारावर श्रद्धा असणारा नेता, कठीण काळात सोबत काम करणारा एक सहकारी गेला. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे.
एक मित्र म्हणून गमावलो: प्रतिकूल काळात ज्यांनी काम केले. त्याने आताच्या अनुकूल काळात असणे गरजेचे होते. कार्यकर्ता म्हणून नाही तर एक मित्र म्हणून आम्ही त्याला गमावला आहे. महिन्यापूर्वीच आमची भेट झाली होती. पुण्यात आले की प्रत्येक वेळेस भेट होत होती. त्याअगोदर ते घरी आले होते. परंतु यावेळी दिल्लीत आल्यावर ते जेवण केले नाही. सामान्याचा जिव्हाळ्याचा नेता अशीच त्याची ओळख होती. ती त्यांनी परिश्रमातून कमावली, अशा भावना यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
बावनकुळे यांनी व्यक्त केल्या भावना: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. बावनकुळे यांनी म्हटले की, बापट यांच्या निधनामुळे दुःख झाले. 2002 ला बापट यांची त्यांच्या घरी पहिली भेट झाली होती. त्याच्यासमोर मी बसलो होतो. मी तेव्हा जिल्हा परिषदला सदस्य होतो. वीस वर्ष त्यांच्यासोबत आम्ही होतो. विरोधी पक्ष म्हणून आपण कसा आक्रमक राहिले पाहिजे, सर्वसोबत सोबत चांगले संबंध ठेवून राजकारण कसे चांगल्या पद्धतीने करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश बापट होते. सार्वजनिक ,सांस्कृतिक ,सामाजिक कार्यामध्ये ते पुढाकार घेत होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा ते माझ्याशी बोलले, मार्गदर्शन केले. अध्यक्षांनी कसे काम केले पाहिजे, पक्ष कसा वाढवला पाहिजे, हे सुद्धा बापट यांनी सांगितले.
हीच खरी श्रद्धांजली : कसबा पोट निवडणुकीत आजारी असताना सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची इच्छाशक्ती होती. ती खूप प्रचंड प्रेरणादायी होती. त्यांना म्हटले की, तुम्ही असे काही करू नका तर ते म्हणले कसब्याला माझी गरज नाही का? तुम्ही मला दोन मिनिटे तरी लोकांशी कार्यकर्त्यांशी बोलू द्या. इतका पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असणारा नेता अशी बापट यांची ओळख आहे. तीच ओळख प्रत्येक कार्यकर्त्यांनी निर्माण करावी हीच खरी श्रद्धांजली असल्याच बावनकुळे म्हणाले आहेत.
कुटुंबाची घेतली भेट: बापट जे राजकारणात कमावले ते आमच्यासाठी शिदोरी आहे. त्यांचे काही संकल्प आहेत ते पूर्ण करणे हेच खरी श्रद्धांजली असेल. ती पूर्ण करण्यासाठी आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन काम करणे हेच अपेक्षित आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. तर अंत्यसंस्काराला वेळेत पोहोचता आले नसल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कुटुंबाची रात्री भेट घेतली आहे.
हेही वाचा: Girish Bapat Passed Away खासदार गिरीश बापट यांचे निधन वाचा खडतर राजकीय प्रवास