पुणे- महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या १२ जागांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फेटाळतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे यांना खासगीत सांगितल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर, आपण कोरेंकडे सांत्वन करायला गेलो होतो. तिथे असे विषय काढायला माझे डोके फिरले आहे का? हा फक्त राज्यापालांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचे आरोप फेटाळून लावले.
हसन मुश्रीफ यांनी आपल्यासंबंधी केलेले आरोप हे निराधार आहेत. त्यांचा दावा हास्यास्पद असून त्यातून लोकांची करमणूक होते. असे स्पष्टीकरणही पाटील यांनी दिले. तसेच, राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे चिंताजनक आहे. त्यांनी शपथ दिल्याशिवाय कोणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही, एवढे ते उच्च स्थानी आहे. मात्र, असे असताना देखील कधी शरद पवार त्यांच्यावर कुत्सितपणे बोलतात तर कधी उद्धव ठाकेर, मुश्रीफ त्यांच्यावर बोलतात, हे न कळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
नक्की काय तयारी केली ते सांगा- चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षण बाबत सर्व तयारी झालेली आहे. आता न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा, असे अशोक चव्हाण म्हणाले असतील, तर नक्की काय तयारी सरकारने केली, ते सांगावे. आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण एक वर्ष न्यायालयात टिकवले होते. विद्यमान सरकार फक्त थापाच मारत आहे. त्यांचे वकील तारखेला वेळेत पोहोचत नाही, आणि तयारी झाली तयारी झाली, असे सांगत आहेत. अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी चव्हाण यांच्यावर केली.