पुणे - ज्याचा हातामध्ये वाढणं असत, तो आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो, तसं आदित्य ठाकरे यांना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं आहे, असा टोला मुंबईमधील वरळी डेअरीच्या जागेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते त्यांच्या विसंवादामुळे लवकरच पडेल, असेही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - Coronavirus: रायगडचे दुबई रिटर्न क्रिकेटर्स पनवेल उपजिल्हा रुग्णालयात
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे हे पर्यटनमंत्री आहेत त्यामुळे मुंबईमध्ये ८ हजार कोटी रुपयांची वरळी डेअरी येथील जागा प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी दिली आहे. यासाठी तब्बल १ हजार कोटी रुपये दिले आहेत. ८ हजार कोटी रुपये खर्च करून प्रेक्षणीय स्थळ उभारण्याची स्थिती महाराष्ट्राची आहे का? मी कृषी मंत्री होतो, ८ ते ९ हजार कोटींमध्ये महाराष्ट्राचा अख्खा दुष्काळ निघतो. त्यात टँकर, गुरांच्या छावण्या, नुकसान भरपाई द्यायची असते. यासाठी 13 कोटी म्हणजे फार झाले.
वरळी येथील कोट्यवधींची जागा ही प्रेक्षणीय स्थळासाठी देणार? आणि त्यावर एक हजार कोटी खर्च करणार, एक हजार कोटी काढले कोठून? त्याची डिझाईन तयार नाही, डिपीआर तयार नाही, इस्टिमेट तयार नाही तर मग हे एक हजार कोटी ठरवले कोठून, असा सवाल करत पाटील यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जनतेची दिशाभूल फसवणूक करणाऱ्या गोष्टींची घोषणा केली आहे. ९३ तासांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुलभूत प्रश्नांना बगल दिली आहे. केवळ राजकीय सोयीनुसार काही घोषणा केल्या असून, ते लवकरच समोर येईल.
सरकार पाडण्यासाठी आम्ही ज्योतीरादित्य सिंधीया शोधणार नाही; विसंवादामुळे सरकार पडेल
सरकार पाडण्यासाठी आम्ही कोणताही शोध लावत नसून, प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. परंतु, हे मी वारंवार म्हटलंय, आज पुन्हा म्हणेल हे सरकार आम्ही पाडणार नाही. आम्ही ज्योतीरादित्यांसारख कोणाला शोधणार नाही. पण आपापसातील विसंवादामुळे हे सरकार लवकरच पडेल, असे पाटील यावेळी म्हणाले.
कोरोनाचा रिपोर्ट येण्याची वेळ कमी करता यावी -
कोरोनाचे संकट लवकर टळो, कोरोना टेस्टचा जो रिपोर्ट येत आहे. त्याच्या वेळेचे प्रमाण कमी करता यावे, यासाठी राज्यशासन, केंद्रशासन प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त रुग्णालयांना परवानगी द्यावी, असे आमचे म्हणणे आहे. मात्र, अजून यातील निर्णय झालेला नाही. हा विषय नवीन आहे, असे पाटील म्हणाले. तसेच पुण्यामध्ये आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे या शहरात खळबळ उडवणारे वातावरण आहे. सर्वांनी काळजी घ्यावी त्यामुळे हे सर्व नियंत्रणात येईल.