पुणे - ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण द्यायला वेळ लागत होता, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी काही उपाय योजना अशा केल्या की मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे जो त्रास होतो त्यावर मलमपट्टी मिळेल. त्यातील सर्वात मोठे उपक्रम होते सारथी. एमपीएससी, यूपीएससीसाठी स्कॉलरशिप, तसेच विविध सोई सुविधा देणे ही सारथीची कल्पना होती. पण, आताच्या सरकारने सारथीची वाट लावली. आणि आता ती कुठे आहे आणि तिचे काय सुरू आहे, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
हेही वाचा - कोरोनामुळे दहा तासांच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, कुटूंबावर दु:खाचा डोंगर
क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि मुकुलमाधव फाऊंडेशनच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ब्राह्मण किर्तनकार व पुरोहितांसाठी एक हात मदतीचा म्हणून शिधा वाटप करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
आम्ही मराठा समाजासोबत, पण पक्षाचा झेंडा वापरणार नाही
भारतीय जनता पक्षाच्यावतीने मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. आम्ही मराठा समाजाचे मोर्चे, आंदोलन यांच्यात सहभागी होऊ, पण आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणि बॅनर घेऊन आंदोलनात सहभागी होणार नाही. आम्हाला मराठा समाजाचे हित बघायचे आहे, त्यामुळे जे जे काही आरक्षण मिळवण्यासाठी करता येईल ते सर्व आम्ही करू. पण, यात आम्ही कुठेही आमच्या पक्षाचा झेंडा, बॅनर घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
म्हणून मोदींनी संभाजीराजेंची भेट घेतली नाही
या देशाची लोकशाही ही इतकी सुदृढ आहे की, प्रत्येकाला काय म्हणायचे, काय नाही करायचे याचे अधिकार आहे. संभाजीराजे हे शाहू महाराजांचे वंशज आहे, त्यांनी त्यांचे मत मांडले आणि विनायक मेटे यांनी त्यांचे मत मांडले. संभाजी राजेंची ज्या ज्या वेळेला इतर कारणांसाठी भेट मागितली असेल, त्या त्या वेळेस नक्कीच मिळाली असेल. मोदी साहेबांचे म्हणणे आहे की, हा विषयच माझा नाही, हा विषय राज्याचा आहे. त्यामुळे, माझी भेट घेऊन काय उपयोग होणार? त्यामुळे चहा प्यायला येणार की अन्य काही विषय आहे? मराठा आरक्षणात केंद्राचा रोल कुठे होता? जे काही करायचे ते तुम्हालाच करायचे आहे, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - किल्ले राजगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा; देवीच्या सुंदर प्रतिमेसह शिवराईंचा समावेश