पुणे : बाबरी मशीद पाडली तेव्हा त्यात शिवसैनिक नव्हते असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आता बिळातून काही उंदीर बाहेर आले आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर : हिंदुत्वाबाबत बाळासाहेब ठाकरेंचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. तसेच मातोश्रीबद्दलही माझ्या मनात आदर असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. बाबरी मशीद पडली तेव्हा त्यात सर्व सहभागी हिंदू होते. त्यांनी फक्त हिंदुत्व म्हणून बाबरीचा ढाचा पाडला एवढीच माझी भूमिका असल्याचे पाटील म्हणाले. मुद्दा असा आहे की, आज संजय राऊत उभे राहून बोलतात. पण बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा संजय राऊत कुठे होते असा सवाल त्यांनी केला. माझे मातोश्रीशी चांगले संबंध असल्याने मी उद्धव ठाकरेंना फोन करून याबाबत विचारणार आहे असेही ते म्हणाले. असे असले तरी बाळासाहेब ठाकरेंचा कुठेही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, कोणी असे म्हणत असेल तर मी खपवून घेणार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
बाळासाहेबांमुळे संरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मला फोन करून माझी भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. मी लगेच पत्रकार परिषद घेतली. बाळासाहेब ठाकरे ज्या ठिकाणी राहायाचे त्या ठिकाणी मी लहानपणापासून राहत होतो. जेव्हा दंगली झाल्या त्यावेळी आम्हाला बाळासाहेबांमुळे संरक्षण मिळाले. त्यामुळे बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात प्रंचड आदर आहे, तोच आदर कायम राहील असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
बाळासाहेबांनी लढण्याची प्रेरणा दिली : बाबरी मशीद पडण्यापूर्वी लढा सुरू होता. हा लढा खुद्द विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली सुरू होता. त्यामुळे तिथे जे सहभागी झाले होते ते हिंदू म्हणून सहभागी होते. त्यात शिवसेना किंवा भाजप अशा पक्षांपैकी कोणीही भाग घेतला नव्हता. मात्र, त्यात शिवसेनेचा सहभाग नव्हता असे मी म्हणार नाही. बाळासाहेबांनी आम्हाला लढण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, अशी प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - BJP Attempt Snatch Hindutva : शिवसेनेकडून हिंदुत्व हिसकावण्याचा भाजपचा प्रयत्न - आप