बारामती (पुणे) - ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर केंद्र सरकारचे पथक आज बारामतीत दाखल झाले होते. पथकाने तालुक्यातील कऱ्हावागज, जळगाव कडेपठार या गावातील शेती व पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकात जी. रमेशकुमार आणि आर. बी. कौल यांचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, तहसिलदार विजय पाटील, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अधिकारी विश्वास ओव्हळ उपस्थित होते.
हेही वाचा-मंगळसूत्र चोरटे बारामती पोलिसांच्या ताब्यात
पथकाकडून केंद्राला अहवाल होणार सादर..
केंद्रीय पथकाने पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील कऱ्हा नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केली आहे. त्यानंतर जळगाव कडेपठार येथील शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी पथकाने केली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील शेतीसह पिकांचे, घरांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन उकडून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टीचे पंचनामे करत शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात नुकसान भरपाई दिली. नुकसान भरपाईचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला होता. अहवालावरून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने राज्यातील नुकसानीची पाहणी करण्यास केंद्रीय पथक पाठवून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.
हेही वाचा-अतिवृष्टी नुकसान पाहणी; केंद्रीय पथक मराठवाडा दौऱ्यावर