बारामती(पुणे) - बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी ( दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. इडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीतही एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.
इडी अथवा आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. यासंबधी अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे.
जरडेश्वरला सोमैयांची भेट.. काय आहे प्रकरण?
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हातातून स्वतःच्या ताब्यात घेणारे व जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोणाची आहे? याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशी मागणी सोमैया यांनी केली. पुर्वी शेतकऱ्यांच्या ताब्यात असणारा जरंडेश्वर कारखाना आता अजीवन भाडेतत्त्वावर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आहे. नावात जरासा बदल करून शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्याची पवार यांची ही चाल असल्याचा आरोप सोमैया यांनी यावेळी केला.
जरंडेश्वर साखर कारखान्यासंबंधी मूळ शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा, वेदना माझ्यासमोर मांडली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने फसवणुकीने शेतकऱ्यांच्या ताब्यातून नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत, असा आरोप सोमैयांनी केला.
हेही वाचा - अजित पवारांच्या गुंडांना आम्ही दमडीची किंमत देत नाहीत - किरीट सोमैया