बारामती - माहेरवरून ५० तोळे सोने आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथील गीतांजली अभिषेक तावरे (वय २१) या विवाहित महिलेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी नणंद सचिता सचिन काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली), वर्षा वाबळे (रा. पुणे), सासू शारदा वसंत तावरे, पती अभिषेक वसंत तावरे व सासरे वसंत केशवराव तावरे (रा. सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
घटनेची हकीकत -
गतवर्षी २४ मे रोजी गीतांजली व अभिषेक यांचा विवाह झाला होता. विवाह पूर्वी झालेल्या बोलण्यानुसार ७ तोळे सोने,१ लाख रुपये हुंड्यासह दीड लाख रुपयांचे गृह उपयोगी साहित्य देण्यात आले. विवाह झाल्याच्या दिवशीच नणंद सचिता हिने नवविवाहित गीतांजली हिला तुम्ही माझ्या भावाचे लग्न थाटामाटात केले नाही. गावातून वरदावा काढली नाही. फक्त ७ तोळे सोने देऊन आमची इज्जत घालवली, असे बोलून अपमानित केले. गीतांजली हिने दुसऱ्या दिवशी सदर बाब वडिलांना फोनवरून सांगितली. त्यावेळी तू मनावर घेऊ नको मी सोळाव्याच्या पूजेला आल्यावर बोलतो, असे सांगून वडिलांनी तिची समजूत काढली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासू शारदा हिने हिला चांगल्या सुटकेस बॅगा मिळाल्या नाहीत. पोत्यात भरून कपडे दिले. असे म्हणत तिचा अपमान केला होता. पती अभिषेक याने तुझ्या बापाची ऐपत तरी आहे का साड्याा घ्यायची. हलक्या साड्या लग्नात दिल्या असे म्हणून तिच्या अंगावर फेकून दिल्या. तुझ्या बापाला सांग ५० तोळे सोने द्यायला, असे म्हणून अपमानित केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सासरच्या दारातच केले अंत्यसंस्कार -
२४ मे रोजी लग्नाच्या वाढदिवशी माहेरकडील मंडळींनी मृत गीतांजली हिला शुभेच्छा देण्यासाठी फोन केले असताना तिने कसल्या शुभेच्छा देता, दोन नणंदा आल्या आहेत, आज माझे मरण दिवस आहे, नणंदा व पतीने मला मारहाण केल्याचे फोनवर रडत सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी सासरे वसंत तावरे यांनी गीतांजलीने शेतात विषारी औषध प्यायले असल्याचा निरोप तिच्या माहेरी दिला. माहेरकडील मंडळींनी तातडीने बारामतीला धाव घेतली. येथून तिला पुण्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा 27 मे रोजी मृत्यू झाला. 28 मे रोजी माहेरकडील संतप्त मंडळींनी सासरच्या दारातच तिचे अंत्यसंस्कार केले.
वाचा सविस्तर - सासरच्या मंडळींवर खून केल्याचा आरोप करत सासरच्या दारातच विवाहितेवर अंत्यसंस्कार