पुणे - हाय ब्लड प्रेशरची समस्या भारतासह जगभरात सामान्य झाली आहे. जागतिक स्तरावर १.१३ अब्ज लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, ही संख्या जगातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे. हायपर टेन्शन ही एक अशी स्थिती आहे, जी सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसते. 17 मे रोजी जगभरात वर्ल्ड हायपर टेन्शन डे साजरा ( World Hypertension Day ) केला जातो. वर्ल्ड हायपर टेन्शन लीगकडून याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबविले जातात. अनेकांना या आजाराबाबात माहिती नसते आणि मग ते वेळेवर यावर उपचार करु शकत नाही. अनेकांना तर हा काय आजार आहे, हेही माहिती नसते.
काय असते हायपर टेन्शन? : विचित्र लाईफस्टाईल, डाएट आणि स्ट्रेस यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. यातील एक समस्या म्हणजे हायपर टेन्शन. ज्याला हाय बीपी असेही म्हटले जाते. हायपर टेन्शन आता एक प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे देशातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटत नसल्याने हा आजार आणखी बळावतो. डॉक्टरांनुसार ही समस्या तणाव, खाण्या-पिण्यातील बदल, दारु, तंबाखू, किडनीशी निगडीत आजाराने किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी झाल्याने होऊ शकते. उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढणे हे आहे. त्यामुळे आहारातील सोडियम कमी केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि रक्तदाब 5 ते 6 MM/HG ने कमी होऊ शकतो. सोडियम दररोज 2,300 मिलीग्राम पर्यंतच घ्यावे. यासाठी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत आणि जेवणात वरून मीठ घेण्याऐवजी मसाले वापरावेत, असा सल्ला डॉक्टर देतात.
...तर तुम्ही हायपर टेन्शनने ग्रस्त : तुमचे हृदय शरीरातील सर्वच अंगाना रक्त पोहोचवण्याचे काम करते. ब्लड फ्लो दरम्यान तुमचे हृदय एक प्रेशर तयार करते. या दबावालाच ब्लड प्रेशर म्हटले जाते. याने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. अशावेळी तुमच्या हृदयाला अधिक काम करावे लागते. सामान्य ब्लड प्रेशर 120/80 एमएमएचजी इतके असते. जेव्हा ब्लड प्रेशर 140/90 एमएमएचजीपेक्षा जास्त झाले असेल तर तुम्ही हायपरटेन्शनने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. हायपरटेन्शनचे कोणतेही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे केवळ हृदयालाच नुकसान होते असे नाहीतर डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या नसांनाही धोका होऊ शकतो. ज्यामुळे तुमची दृष्टी कमजोर होण्याचीही शक्यता असते. तसेच यामुळे किडनीवरही परिणाम होतो.
'ही' आहेत लक्षणे : हायपर टेन्शनची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे- छातीत भरुन येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, खूप जास्त थकवा जाणवणे, मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे, सतत खोकला येणे, भूक कमी लागणे. हायपर टेन्शनवर उपाययोजना म्हणजे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये हेल्डी फूडचा समावेश करावा लागेल. हिरव्या भाज्या अधिक खायला हव्यात. सतत बाहेरच खाणे टाळा. रोज नियमीत व्यायाम करा. एकाच जागेवर जास्तवेळ न बसता शरीराची हालचाल वाढवा. मद्याचे सेवन कमी करा. स्मोकिंग करु नका, असा सल्ला पुण्यातील डॉ. कामरान इनामदार यांनी दिला आहे.
हेही वाचा - Prediabetes : प्रीडायबेटिसमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो