पुणे - चाकण औद्योगिक क्षेत्रातील आळंदी फाट्याजवळील कुरुळी हद्दीतील पीसीपी या पुठ्ठ्यांचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर तत्काळ कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आले.
कारखान्यामध्ये कामगार वेल्डिंगचे काम करत असताना उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणावर पुठ्ठा, फोम असल्यामुळे आगीने काही क्षणांमध्ये रौद्र रूप धारण केले. आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण कारखाना वेढला. घटनेनंतर एमआयडीसी व पिंपरी चिंचवड महापालिका यांचे प्रत्येकी एक अग्निबंब, सुमारे चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, संपूर्ण कारखाना आगीने वेढल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. कंपनीचे वरील भागाचे भिंतीचे पत्रे फोडून आतमध्ये पाण्याचे फवारे सोडण्यात आले. तब्बल ८ तासानंतर आग पूर्णपण आटोक्यात आली.
दरम्यान, आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. यामध्ये कंपनीतील कच्चा पक्का माल, यंत्रसामुग्री, कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.