पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या कारने महामार्गाच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की तीनही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामधील दोघांची ओळख पटली आहे. राहुल बाळकृष्ण कुलकर्णी आणि विजय विश्वनाथ खैरे अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात द्रुतगती मार्गावरील उर्से गावाजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे. अपघात अत्यंत भीषण असल्याने कारचा पुढील भाग अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसूून आले आहे.
अपघातात चालकाचाही जागीच मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रकला मागून कारची धडक बसल्याने भीषण अपघात घडला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कार क्रमांक MH04 JM 5349 ही किलोमीटर 82.00 च्या दरम्यान महामार्गलगत उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक RJ 09 GB 3638 याला मागून जोरदार धडकली. अपघातात चालकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा या अपघातात मदतकार्य करत होती. वाहने बाजूला करत महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत केली आहे. अधिक तपास शिरगाव पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले.
मागील शुक्रवारी अपघातात ६ जण ठार: उत्तर प्रदेशमधील अंबाला येथे मागील शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. पंचकुला यमुनानगर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने बसला मागून धडक दिल्याने आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वीसहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ६ जणांचे मृतदेह अंबाला येथील नारायणगढ सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले.
नाशिकमध्ये भीषण अपघात: दुसरीकडे राज्यातही नाशिकमध्ये नुकतेच मोठा अपघात झाला. त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणवाडे येथे नयना कोरडे या तीन वर्षाच्या बालिकावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी जात होते. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे ब्राह्मणवाडे येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात वनविभागाचे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.