जुन्नर (पुणे) - नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात आंब्याच्या वळणावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 31 जाने.) रात्रीच्या सुमारास घडली असून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आळेफाटा व मुरबाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माळशेज घाटातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील आंबा वळणावर खासगी बस प्रवासी घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे. अपघातात गंभीर जखमींना तातडीने स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
माळशेज घाटातील धोकादायक नागमोडी वळण असून या मर्गात सतत दरडी कोसळतात. यामुळे या घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. या घाटातील धोकादायक प्रवास आजपर्यंत अनेकांच्या जिवावर बेतला आहे. त्यामुळे माळशेज घाटातील अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
हेही वाचा - दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री