पुणे - कोरोनाशी दोन हात करुन अनेकांना मदतीचे हात देणारे आपण रोजच पाहतो आहे. यातून खऱ्या अर्थाने माणसातील माणुसकीचे दर्शन घडते. मात्र, हिच माणुसकी काही समाजकंटकांमुळे बदनाम होत आहे. असाच माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार शिरुर तालुक्यात उरळगाव परिसरात घडला आहे. पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मित्राच्या मदतीने मेव्हण्यानेच दाजीचा मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत व धडाचे तुकडे करुन भीमानदी पात्रालगत फेकले होते. याप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत चोवीस तासाच दोघांना अटक केली आहे. जालिंदर सुखदेव थोरात व हिरामण चोरमले अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
शिरुर तालुक्यातील उरळगाव येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत व धडाचे तुकडे असलेल्या स्थितीत आढळून आला होता. दरम्यान सदर पथकाने सर्वप्रथम गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला. यावेळी मृताचे नाव बापू तावजी शिंदे, (रा. मलठन,ता. शिरूर, जि.पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मेव्हण्याने आपला दाजी बापू शिंदे याचा 'दृश्यम' चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पुरावा मागे न ठेवता खून करण्याचा कट तयार केला. व तयार केलेल्या कटाप्रमाणे बापू शिंदे यांस मलठण येथून उरळगाव येथे मासे आणण्यासाठी जाण्याचा बहाणा करुन उरळगाव येथे घेऊन गेले. तेथे ठरल्याप्रमाणे दुसरा आरोपी हिरामण चोरमले हा कुऱ्हाड घेऊन आला व त्या दोघांनी संगनमत करून बापू शिंदे यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हात, पाय, पोट कुऱ्हाडीने तोडून मृताचे प्रेत भीमा नदीच्या पात्रात टाकून दिले. अशाप्रकारे कोणताही सुगावा मागे नसताना निर्घृण खुनाचा कट गुन्हे पथकाने उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पथकास बक्षीस जाहीर केले आहे. पथकाने मृतदेह मिळाल्यानंतर चोवीस तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.