पुणे (आंबेगाव) - दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजनाला प्रत्येक घराघरात केरसुनीरुपी लक्ष्मीचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे दिवाळी सणावर आर्थिक मंदीचे संकट उभे राहिले. त्यामुळे घराघरांमध्ये पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मी ज्या घरांमध्ये निर्मिती होतात. ती घरे दिवाळीच्या तोंडावर अंधारात आहेत. पाचवीला पुजलेली गरिबी, कितीही कष्ट केले तरी मिळणारा अल्प मोबदला, त्यामुळे ही कुटुंबे आर्थीक संकटात आहेत. कारागीर सांगतात, व्यापारीही कवडीमोल भावाने केरसुणी विकत घेतात. यातून होणारी आर्थिक पिळवणूक उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते. मात्र आम्ही तयार केलेली केरसुनी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येक घरात लक्ष्मीच्या रुपात जाते, याचे आम्हाला समाधान आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा
दिवसभर रानावनात भटकंती करून शिंदीच्या झाडाचे काटेरी फड गोळा केले जातात. डोक्यावरून वाहतूक करत घरी आणून वाळवले जातात. त्यानंतर या फडांची साळणी केली जाते आणि मग केरसुनी म्हणजेच लक्ष्मी तयार केली जाते. या कामात कुटुंबातील प्रत्येक सदस्य दीपावलीच्या आधी दोन महिने मोठ्या मेहनतीतून लक्ष्मी म्हणजेच केरसुनी बांधण्याचं काम करत असतो. यातून मिळणाऱ्या मोबदल्यात संपूर्ण वर्षभराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. यामध्ये मुलांचे शिक्षण, घर खर्च, कपडे, लग्नकार्य, अशी सर्व कामे या केरसुणी व्यवसायावर अवलंबून असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न कारागीर विचारतात.
दिवाळीच्या तोंडावर केरसुनी व्यवसायावर कोरोनाचे संकट
या कामात प्रत्येक व्यक्ती दिवसाला 70 ते 80 केरसुण्या तयार करतो. यातून केरसुणीला 20 ते 50 रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र दिवसभराची मेहनत लक्षात घेता या कामातून मिळणारा मोबदला फारच कमी आहे. त्यातून यंदा कोरोना महामारीचे संकट डोक्यावर असल्याने केरसुणी विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे तयार केलेला माल विक्री कुठे व कसा करायचा असा गंभीर प्रश्न या कारागिरांसमोर उभा राहिला आहे.
केरसुनी हे लक्ष्मीचे रूप
केरसुनी तयार करणारा समाज हा गावाबाहेर वास्तव्याला असतो. यातील काही कुटुंब लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात वाद्य वाजविण्याचे काम करतात. तर काही केरसुण्या बनवतात मजुरीने कामाला जाण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कधीही चांगला म्हणून केरसुनी व्यवसायाकडे अनेक जण वळाले. यामध्ये कष्ट भरपूर आणि मोबदला कमी मिळतो. मात्र या मेहनतीतून तयार केलेली केरसुनी लक्ष्मीच्या रूपात प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाची भरभराट करते. यातून चांगले समाधान मिळत असल्याचे कारागीर सांगतात.