पुणे - आंबेगाव तालुक्यातील थोरांदळेमध्ये ६ वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंचर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. मात्र, बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याने एनडीआरएफच्या टिमला पाचारण करण्यात आले आहे. रवी पंडित मिल, असे बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाचे नाव आहे.
सध्याची दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वत्र पाण्यासाठी बोअरवेल घेतले जात आहेत. काही दिवसांपुर्वी थोरांदळेमध्ये २०० फूट खोल बोअरवेल घेतला होता. याच बोअरवेल जवळ खेळत असलेला रवी(वय ६) हा बोअरवेलमध्ये पडला. रवी बोअरवेलच्या १० फूट खोलीवर अडकला आहे. बोअरवेलमध्ये पडल्यानंतर रवी 'मला वाचवा' अशी हाक देत असून स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यश मिळत नसल्याने एनडीआरएफच्या टिमला पाचारण करण्यात आले आहे.