पुणे- 'रॉ'चा एजंट असल्याचे सांगत मोठ्या शस्त्रसाठ्याची माहिती देण्यासाठी एक व्यक्ती कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, कोंढवा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून त्याची बनवेगिरी सुटली नाही. कोंढवा पोलिसांनी थेट आयबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खातरजमा केली. तेव्हा तो व्यक्ती तोतया असल्याचे लक्षात आले. यानंतर त्याला पोलीसी खाक्या दाखवताच तो बिहारमधील एका खुनाच्या गुन्ह्यात फरार असल्याचे उघड झाले. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू सुरज तिवारी (वय.२६, रा. कोंढवा बुद्रुक, मुळ. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तोतया रॉ एजंटचे नाव आहे. तो स्वत:ला बिहारमधील अॅडिशनल एसपी असल्याचे सांगून रॉसाठी काम करत असल्याचे भासवत होता. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल फडतरे यांनी फिर्याद दिली आहे. सोनू तिवारी शनिवारी दुपारी कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेथे त्याने मोठ्या रुबाबात रॉचा एजंट असल्याचे सांगितले. बिहारमधून मोठा शस्त्रसाठा कोंढवा परिसरात येणार आहे. हे ऑपरेशन आपल्याला मिळून करायचे आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यावरून कोंढवा पोलिसांनी तातडीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
पोलिसांनी सोनूला ओळखपत्र विचारले असता, त्याने आपण ते जवळ ठेवत नसल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांना थोडा संशय आला. त्याला शस्त्रसाठा कोठे येणार याची माहिती विचारल्यावर उत्तरात विसंगती आढळली. यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी आयबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या नावाचा कोणताच अधिकारी नसल्याचे सांगितले. यावर कोंढवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला. यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. सोनू तिवारी हा मुळचा बिहारमधील असून, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात राहत आहे. तो बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील कासमा गावचा आहे. वादविवादातून त्याने तेथे आका नावाच्या व्यक्तीचा खून केला. त्यानंतर तो पुण्यात आला होता. बिहार पोलीस त्याचा शोध घेत होते.
हेही वाचा- तिसऱ्या मजल्यावरून पडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, दोन्ही किडन्या झाल्या होत्या निकामी