पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 24 मार्च रोजी आपल्याला महिलांनी मारहाण केल्याने अपमान झाल्याच्या रागातून खाणीत उडी मारुन आत्महत्या केली होती. अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा धानोरी गाव) असे या मृत रिक्षाचालकाचे नाव असून याबाबत त्याची पत्नी अश्विनी टिंगरे यांनी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. विश्रांतवाडी पोलीसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दारू प्यायचे व्यसन होते: याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अजय टिंगरे हा धानोरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. त्याला दारू प्यायचे व्यसन असून 23 मार्च रोजी रात्री दारु पिऊन आला होता. घरासमोर उभे राहून शिवीगाळ करत होता. तेव्हा शेजारी राहणाऱ्यांनी अश्विनी टिंगरे यांना पतीला समजावण्यास सांगितले. तो ऐकत नसल्याने शेजारच्या लोकांनी 112 नंबरला कॉल केल्यावर पोलीस घरी आले. त्यांनी अजय याला समज दिली होती. त्यानंतर तो घरी जाऊन झोपला. मात्र हे झाले असले तरी हे प्रकरण इथेच थांबले नाही.
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली: दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने या रिक्षाचालकाच्या घरात घुसले आणि हा रिक्षाचालक झोपेत असतानाच त्याला मारहाण करायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला घराबाहेर आणले. फिर्यादी म्हणजेच पत्नी अश्विनी टिंगरे यांनी आरोपींना त्याला मारु नका अशी विनवणी केली. तेव्हा त्यांनी तो मार खायच्या लायकीचाच आहे. याला मारा असे सांगून त्याला आणखी मारहाण केली.
खाणीत उडी मारली: त्यानंतर फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाल्या. त्यांच्या मुलीने तक्रार करण्यासाठी 112 ला कॉलही केला. यावेळी अपमानीत झालेला अजय टिंगरे हा मोपेड घेऊन घराबाहेर पडला. त्याच्या मागो त्याची मुलगी व एक ओळखीच व्यक्ती सोमा गेरंम हे गेले. राहत असलेल्या ठिकाणी ते ही ओळखीच्या महिलांनी मारहाण केल्यामुळे मनाला संताप होऊन अपमानित झाल्याने अजय टिंगरे याने विश्रांतवाडी धानोरी रोडवरील खाणीजवळ थांबून उडी मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ओळखीच्या सोमा गोरंम यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.तेव्हा रिक्षाचालक अजय याने गोरंम याच हात झटकून स्वत: खाणीत उडी मारली. अग्निशामकदालाच्या सहाय्याने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता. सोमवारी सकाळी खाणीच्या पाण्यातुन त्यांचा मृतदेह पाण्याच्यावर आल्यानंतर अग्निशामक दलाने तो खाणीतुन बाहेर काढला. या घटनेचा विश्रांतवाडी पोलीस तपास करत आहेत.