पुणे - भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 'युवा वॉरियर्स' या उपक्रमाचा शुभारंभ उद्या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी किल्ले सिंहगड येथून होणार आहे. या उपक्रमांतर्गत भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात आवड असणाऱ्या युवांना जोडून त्यांच्यासाठी त्यांना रुची असणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा - चालू क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15 ते 25 वयोगटातील तरुणांचा असणार सहभाग
सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवकांचे योगदान फारच महत्वाचे आहे. आपल्या देशातील युवा हा फार प्रगल्भ आहे. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यास त्याचा उपयोग आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी होऊ शकतो. अशा विविध क्षेत्रातील युवांचा लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घडवून देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, या हेतूने भाजप युवा मोर्चाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
युवांना जोडण्यासाठी प्रयत्न करणार
राज्यभर युवा वॉरियर्सच्या शाखांची निर्मिती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती, गावा पर्यंत व शहरी भागात वॉर्ड स्तरापर्यंत शाखांचे निर्माण करण्यात येणार आहे. तयार झालेले युवा वॉरियर्स पुढे विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण उपक्रम करून युवांना जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. युवा मोर्चाचे शुभारंभ उद्या सिंहगड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाचा शेवट सिंधखेड राजा येथे होणार असल्याची माहिती विक्रांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा - अबू आझमींचे डोके ठिकाणावर आहे का? - तृप्ती देसाई