पुणे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मेळाव्यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची छेडछाड झाली. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सल्ले देण्यासाठी सोमवारी मेळावा बोलवला होता. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाटील यांचा सत्कार करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी स्टेजवर देखील गर्दी करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी देखील चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत महिला पदाधिकाऱ्यांच्या साड्यांचे पदर ओढणे, चिमट काढणे असे प्रकार घडले असल्याच्या तक्रारी महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील महिलांनी केला आहे. मात्र, या प्रकाराने संतप्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.