पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांचे पुण्यात आगमन झाले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल होणार आहे. ब्रिजभूषण सिंग पुण्यात आले असताना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पक्षश्रेष्ठींकडून यावर प्रतिक्रिया देण्यास मनाई केली असल्याचे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
महेंद्र गायकवाडचा विजय : माती विभागातून झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मैदानात उतरल्यानंतर दोन्ही मल्लांनी एकमेकांना केवळ दहा सेकंदच आजमावले. त्यानंतर महेंद्र गायकवाडने थेट एक टांग डाव टाकला अन शुभमचा तोल गेला. मिळालेल्या संधीचा फायदा करून घेताना महेंद्र गायकवाडने शुभमला थेट चीतपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिकंदर शेखने बाजी मारली : दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बालारफिक शेखला केवळ ३० सेकंदात चीतपट करताना माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. सिकंदर शेखने बाला रफिक शेखवर पहिल्या १५ सेकंदात ताबा मिळविताना २ गुणांची कमाई केली. त्यानंतर आपले आक्रमण अधिक धारधार करताना सिकंदर शेखने बाला रफिकवर भारंदाज डाव टाकताना कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये नेवून बलाराफिकला दाबत चीतपट करताना मैदान मारले.
गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर : गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. तुषारने निष्क्रिय कुस्ती केल्याने एक गुण हर्षवर्धनला देण्यात आला. त्यानंतर कटऑफमुळे हर्षवर्धनला पुन्हा एकदा एक गुण मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुषारच्या निष्क्रिय खेळामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीत हर्षवर्धनने ३ -० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने तुषारवर ताबा मिळविताना अजून दोन गुण वसूल केले. व गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
शिवराज राक्षेचा विजय : दुसऱ्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत करताना गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत शिवराजने तीन वेळा गणेशला मैदानाबाहेर ढकलताना ३ गुणांची कमाई केली. त्यावेळी गणेशने एकदा शिवराजला मैदानाबाहेर ढकलत एक गुण वसूल केला. त्यानंतर शिवराजने दुहेरी पट काढताना २ गुण मिळविताना ५-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत मात्र शिवराजने अजून आक्रामक खेळ करताना गणेशवर ताबा मिळवत २, झोळी डावावर २ आणि कुस्ती धोकादायक स्थितीत नेवून २ असे तब्बल ६ गुण वसूल करताना गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा : Maharashtra Kesari : आज महाराष्ट्राला 65 वा महाराष्ट्र केसरी मिळाणार.. 'कोण' होणार विजयी ?