पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना याच संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंसोबत देखील केली होती. मला असे वाटते त्यामध्ये काहीही चुकीचे नाही. शेवटी आपण म्हणतो ना, तुम्ही देव माणूस आहात. मग देवाची उंची कमी झाली का? देवाचे गुण तुमच्यामध्ये आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्या लेखकाने केली त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. काही वेळ तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता. आता भाजपचा आहे. मात्र, भाजपचे ते काही अधिकृत प्रकाशन नाही. तसेच आम्ही त्याचा कुठल्या अभ्यासक्रमात समावेशही केला नाही. त्यामुळे 'आज के शिवाज नरेंद्र मोदी' हे पुस्तक कशामधून काढून टाका म्हणतात? हेच मला कळत नाही. प्रकाश जावेडकर यांनी पुस्तक काढून टाकण्याची घोषणा केली. मात्र, ते देखील कशामधून हे पुस्तक काढणार आहे, हे माहिती नाही.
महाराजांचे गुण मला मोदींमध्ये दिसतात. त्यामुळे ते अलिकडच्या काळातील शिवाजी महाराज असतील, असे त्या लेखकाचे मत आहे. ते भाजपचे अधिकृत प्रकाशन नाही. त्यामुळे त्यासंबंधितचा वाद संपलेला असल्याचे ते म्हणाले.