पुणे - आरक्षण आमच्या हक्काचं... उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो... ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान में... अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द -
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणाऱ्या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसींना मिळणारे अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देखील महाविकास आघाडी सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाबाबतही तीच स्थिती झाली आहे. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही समाजाचे आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या विरोधात आज (गुरुवार) हे आंदोलन आम्ही करत आहोत. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आम्ही असेच रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांनी सांगितले.
अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू -
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन काही नेतेमंडळी महाराष्ट्रातील जनतेची धूळफेक करीत आहेत. मात्र, ओबीसी समाज त्यांच्या या धोरणांना चांगलेच ओळखून आहे. त्यामुळे आता यापुढे ओबीसी समाज शांत बसणार नाही. महाविकास आघाडी, ठाकरे सरकारने जनतेची दिशाभूल केली असून त्याविरोधात भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा आक्रोश आंदोलन करीत आहे. आणि जर आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण नाही मिळाले तर यापूढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी पिंगळे यांनी दिला.
हेही वाचा - पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ