पुणे - माण येथील भाजप आमदार जयकुमार गोरे शनिवारी शरद पवारांचे पुण्यातील निवासस्थान मोदी बाग येथे आले होते. मात्र, त्यांना पवारांनी भेट नाकारल्याची चर्चा आहे. जयकुमार गोरे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच पक्षांतर केलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचे विधान राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गोरे पवारांच्या निवास्थानी आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ते मोदी बागेतून बाहेर आल्यावर आपण पवारांना भेटायला आलोच नव्हतो, असे त्यांनी सांगितले. शरद पवार याठिकाणी राहतात हेच माहिती नाही. मी खासगी कामासाठी येथे आलो असल्याचे गोरे यांनी सांगितले. तसेच पवार मला का भेटतील? असा पवित्रा घेत त्यांनी भेट झालीच नसल्याचा दावा केला.
दुसरीकडे जयकुमार गोरे गेल्यानंतर काही वेळाने शरद पवार मोदी बागेतून बाहेर पडले. मात्र, जयकुमार गोरे याठिकाणी आले हे माहिती नसल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच ते याठिकाणी कशाला येतील? असा प्रतिप्रश्न करीत पवार निघून गेले.
दरम्यान, रविवारी दिल्लीला जात असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, सत्ता स्थापनेबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राजभवनाला विचारा असे उत्तर दिले.