पिंपरी-चिंचवड (पुणे) - महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याविरोधात भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 12 ऑक्टोबर) भोसरी येथे आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बालात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांड तसेच कोरोना सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व रुग्णालयात महिलांवरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. वारंवार तक्रारी, निवदने आणि आंदोलन करूनही या असंवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने छेडण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाच्या वतीने होणाऱ्या या आक्रोश आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.
हेही वाचा - मंत्री टोपे यांचे अनलॉकबाबत विधान कोणताही विचार न करता केलेले - डॉ. भोंडवे