पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत भाजपने विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाचा विश्वासघात केला हे जनता ठरवेल, असे ते म्हणाले. राज्यात डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे स्पष्ट होईल असे सांगत त्यांनी मध्यावधी निवडणुकांचीही शक्यता वर्तवली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटले असताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी वर्तवलेल्या या भाकितामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, सभागृह नेते हेमंत रासने उपस्थित होते.
हेही वाचा - आशिष शेलारांविरोधात पुण्यात शिवसेनेची निदर्शने
चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकांना माहीत आहे, कोणी कोणाचा विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल, तर असे काही होणार नाही. त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे लोक ठरवतील. महाविकास आघाडीचे सरकार जेमतेम कामाला सुरुवात करत असताना पाटील यांच्या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आता यावर महाविकास आघाडीतील नेते काय उत्तर देतात याकडेच अनेकांचे लक्ष्य लागले आहे.
हेही वाचा - पुण्यात चाललंय काय! सिंहगड रस्ता परिसरात चाळीस दुचाकी अज्ञाताने दिल्या ढकलून