पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपची राज्यभर महाजनादेश यात्रा सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरत आहेत. भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. भाजपची ही महाजनादेश यात्रा आज पुण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी ही यात्रा पुण्यातल्या हडपसरमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी चक्क 270 किलोचा हार तयार करून घेतला आहे.
मुख्यमंत्र्याचे भव्य स्वागत करून योगेश टिळेकर आपली उमेदवारी घट्ट करत आहेत. पुणे शहरातल्या ८ विधानसभा मतदारसंघात भाजपचाच झेंडा आहे. पुन्हा भाजपच विजयी होईल असे वातावरण रंगवले जात आहे. या आठही मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. पुणे शहरात ज्या भागातून ही यात्रा जाणार आहे तिथल्या रस्त्यासह शहरभर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्याची तीव्र स्पर्धा इच्छुकांमध्ये लागली आहे. अशातच हडपसरमध्ये डळमळीत होत असलेली दावेदार तब्बल 270 किलोच्या हाराने मजबूत करण्याचे योगेश टिळेकर यांचे प्रयत्न दिसत आहेत.
महाजनादेश यात्रा पुण्यात प्रवेश करत असताना हडपसरमध्ये यात्रेचे स्वागत होणार आहे. यावेळी हा अतिभव्य हार मुख्यमंत्र्यांना घालून तिकीट मिळवून देण्याचा भार मुख्यमंत्र्यांवर टाकण्याचा टिळेकरांचा प्रयत्न आहे.