पुणे - शहरात भाजपचे काही नगरसेवक नाराज असले तरी त्याचा अर्थ हे नगरसेवक बंड करणार, असा होत नाही. ही अफवा असून पक्षांतर्गत असंतुष्ट किंवा विरोधकांनी ही अफवा फैलावली आहे. भाजपातून कुठलेही नगरसेवक बाहेर पडणार नाही, असे भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - पिंपरीत पिस्तूलच्या धाकावर तरुणीचे अपहरण; सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या
गेल्या काही दिवसांपासून भाजप मधील संजय काकडे गटाचे नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, हे नगरसेवक बंड करून बाहेर पडतील असे देखील चर्चा असल्याने याबाबत संजय काकडे यांनी स्पष्टीकरण दिले. भारतीय जनता पक्षात कुठलेही गट नाहीत. सर्वजण एक दिलाने काम करतात, त्यामुळे आमच्यात गट नाही आणि कुठलेही बंड नाही, असे काकडे यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील कोल्हापूर मधून निवडणूक लढवतील - काकडे
पुण्यातले काही नगरसेवक हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याच्या चर्चेवर संजय काकडे यांना विचारले असता, हे पूर्णपणे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे, की ते आता यापुढे कोल्हापूर मधून निवडणूक लढवतील. त्यामुळे, त्यांच्याबाबत असंतुष्ट असण्याचा प्रश्न उरला नाही. ते कोल्हापूरमधून निवडणूक लढवतील आणि गरज पडली तर मी त्यांचा प्रचारप्रमुख म्हणून देखील काम करेल, असे काकडे म्हणाले.
एकंदरीतच पुण्यातील भाजप नगरसेवकांच्या बंडाचे वृत्त संजय काकडे यांनी फेटाळून लावले आहे. तसेच, धनंजय मुंडे प्रकरणी, ते त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यासाठी त्यांचा राजिनामा मागणे चुकीचे असल्याचे आपले वैयक्तिक मत आहे, असे काकडे यांनी सांगितले. त्यांच्यावर राजकारण करणे योग्य नाही. या प्रकरणात पोलीस काय तो शोध घेतील, असेही काकडे म्हणाले.
हेही वाचा - हापूस आंब्याची पुण्यात दमदार एन्ट्री, पहिल्या पेटीला विक्रमी 25 हजारांचा भाव