पुणे: पुण्याची कसबा विधानसभा पोटनिवडणूक आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती. यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. तसेच, ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशीही चर्चा आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण विरोधी पक्षांना बिनविरोध करण्यासाठी प्रत्यक्ष आवाहन करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आज शनिवार (दि. 4 जानेवारी) रोजी कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडसाठी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तर कसबामधून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे.
कुणाल यांच्या नावाची भर: भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते केले. खरंतर गेल्या महिन्यात भाजपचे प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली होती. भारतीय जनता पक्षाने नवीन यादीत कुणाल यांच्या नावाची भर घालून ती पुन्हा प्रसिद्ध केली. यामुळे भाजपचा उमेदवार टिळक परिवारातील नसणार का? ही चर्चा सुरु होती. त्यानुसार टिळक परिवारात उमेदवारी देण्यात आली नाही.
अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा: महाविकास आघाडीने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी कसब्यातून काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये आम आदमी पार्टी देखील निवडणूक लढवणार आहे. मागील काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर आज अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल. दरम्यान, या रिक्त जागांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता होती. मात्र नंतर कोणीही माघार घेत नसल्याचे चित्र दिसून आले. यामुळे रंगत वाढली आहे.
कोण आहेत हेमंत रासने: हेमंत रासने हे पुणे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्ता म्हणून संधी मिळाली. भाजपचे ते विविध माधमातून अनेक दिवसांपासून काम करत आहेत. त्यांची भाजपचा खास कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. आज भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ते चर्चेत आले आहेत. दरम्यान, रासने म्हणाले, सर्वांच्या अपेक्षा आपण पुर्ण करणार आहोत.
कोण आहेत अश्विनी जगताप ?: अश्विनी जगताप या भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप हे भाजपकडून आमदार होते. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. परिणामी लक्ष्मण जगताप हे राजकीय जीवनात सक्रिय नव्हते. तरीही महाराष्ट्राच्या सत्तांतरापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी लक्ष्मण जगताप हे पुण्यातून रुग्णावाहिकेतून मतदानासाठी मुंबईला गेले होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर ही पोटनिवडणुक होत आहे.
जबाबदारी वाढली: भाजपमध्ये गटातटाचे राजकारण नसते. पक्ष ठरवते, त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करतात. नगरसेवक म्हणून १२ ते २० वर्षांपासून काम करताना आता राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली, यामुळे आता जबाबदारी वाढली असे हेमंत रासने यांनी सांगितले. चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.