बारामती (पुणे) - राज्यात काही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळला असताना इंदापूर तालुक्याचीही चिंता वाढली आहे. इंदापूर तालुक्यातील रुई गावात नऊ देशी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. संशयीत मृत पावलेल्या नऊ कोंबड्यांचे पुण्याच्या प्रयोग शाळेमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील रुई गावातील एका शेतकऱ्याच्या नऊ कोंबड्यांचा रविवारी अचानक मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी रामंचंद्र शिंदे हे तात्काळ रुई गावात पोहोचले. त्यांनी मृत कोंबड्यांचे नमुन्यांचे अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या संशयितरित्या अचानक दगावलेल्या देशी कोंबड्यांचे अहवाल लवकरच येणार आहेत. या कोंबड्यांचा अहवाल येईपर्यंत चिकन व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा-बर्ड फ्ल्यू : राज्यात एकूण १००० पक्षांचा मृत्यू; तपासणीसाठी नमुने पाठवले
नागरिकांनी सतर्कता घेणे महत्त्वाचे...
दोन दिवसापूर्वीच पुणे जिल्ह्यातील मावळ आणि दौंड तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मावळ तालुक्यातील पाच हजार पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील 418 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा संसर्ग सध्या वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता घेणे महत्त्वाचे आहे. सध्या बर्ड फ्लूचा शिरकाव इंदापूर तालुक्यात झाला नाही. रुई गावातील मृत कोंबड्यांच्या अहवालानंतरच सर्व गोष्टी समोर येणार आहेत.
हेही वाचा-बर्ड फ्लूचे संकट: मुंबईत २४ तासांत २१४ पक्षांचा मृत्यू
राज्यात एकूण ९ जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव-
राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव वेगाने होऊ लागला आहे. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदा ८०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यानंतर बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १५ जानेवारीला राज्यात तब्बल १००० हून अधिक पक्षी बर्ड फ्ल्यूचे बळी ठरल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात एकूण ९ जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूने आपले पाय पसरले आहेत.