पुणे - गाईच्या तुपात भेसळ करून विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ४ लाख ५० हजारांचे १ हजार ४९९ किलो भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले आहे. शिवराज हळमणी (रा. हात्तीकनबस, अक्कलकोट ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक आंबेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून गाईचे भेसळयुक्त तूप विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती कर्मचारी राहूल तांबे आणि सचिन पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका महाविद्यालयासमोर आलेल्या टेम्पोचालकाला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याच्याकडील टेम्पोतील गाईच्या तुपात भेसळ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार भेसळयुक्त तुपाची खात्री झाल्यानंतर १ हजार ४९९ किलो तूप जप्त करण्यात आले आहे.