पुणे (राजगुरुनगर) - भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी हक्काच्या पुनर्वसनासाठी कुटुंबासह जलसमाधी आंदोलन करत आहेत. आंदोलक धरणाच्या पाण्यात उतरले असल्याने प्रशासनाची बुधवारी दिवसभर धावपळ पहायला मिळाली. पोलीस, एनडीआरएफचे पथक गावांमध्ये जलसमाधी आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, 23 गावांतील नागरिक वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन आंदोलन करत होते. लहान मुले, महिला, वयोवृद्ध, तरुण अशा सर्वांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. पाण्यात बसून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करत धरणग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन रात्रीच्या वेळीही सुरुच ठेवले आहे.
पात्र व अपात्र लाभार्थी असा फरक तयार करुन रोख स्वरुपात मोबादला देण्यासाठी शासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले. यासाठी 7 उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, पैसा नको जमिनीला जमीनच द्या, असे म्हणत शेतकरी आक्रमक झालेत.
पुण्याच्या पूर्वभागाला भामा-आसखेड धरणातून पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय जॅकवेलपासून एक किलोमीटर जलवाहिनीचे काम करणार नाही, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी यांनी धरणग्रस्तांना दिले होते. मात्र, अद्यापही धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नसताना जलवाहिनीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आल्याने धरणग्रस्तांची फसवणूक होत असल्याची तक्रार करत 23 गावांतील धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. काही शेतकरी आमरण उपोषण करत आहेत, तर दुसरीकडे काही शेतकरी धरण्याच्या पाण्यात उतरुन जलसमाधी घेण्याच्या तयारीत आहे.