पुणे- गेल्या दोन दिवसांपासुन भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भीमा व भामा नदीपात्र दुथडी भरुन वाहत असल्यामुळे भामा नदीवरील भामा-आसखेड धरण आणि भीमानदीवरील चासकमान धरणातून पुन्हा विसर्ग करण्यात आला आहे. भामा-आसखेड धरणातून 12 हजार तर चासकमान धरणातून 11 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सह्याद्रीच्या कुशीत गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, मागील 24 तासांपासून पावसाचा जोर वाढल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील नद्या, ओढे, नाले दुथडीभरून वाहत आहेत. मात्र सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान होत आहे.