पुणे Bawankule On Narvekar : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील विनायक नवयुवक मित्र मंडळातर्फे 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत केलेल्या विधानावर बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, राहुल नार्वेकर कधीही नियमबाह्य काही करणार नाहीत. त्यांना कितीही काही म्हटलं तरी ते एक उत्कृष्ट वकील आहेत. त्यांना कितीही डिवचण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी निकालावर काहीही परिणाम होणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
महायुतीचं टार्गेट हे 45 खासदारांचे : यावेळी बावनकुळे यांना मुख्यमंत्री बदलाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, याबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणतीही चर्चा नाही. शेवटी काहीतरी चर्चा तयार करण्याकरता फुसका बॉम्ब फोडलेला असावा, असं यावेळी बावनकुळे म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच आमदारांना टार्गेट दिलं आहे. महायुतीचं टार्गेट हे 45 खासदारांचं आहे. आम्हाला विश्वास आहे की, मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे आणि लोक कमळलाच मतदान करतील.
आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने : संसदेच्या कायद्याप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. राष्ट्रपती यांना नेहमीच सन्मान देण्याचं काम मोदीजी यांनी केलं आहे. काँग्रेस जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत आहे. राष्ट्रपती यांच्या बद्दल पूर्ण आदर आहे. सगळीकडे त्यांना मान आणि महत्त्व आहे. मोदी कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. काँग्रेसला कधी वाटलं होत का, आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवावं, ते फक्त संभ्रम निर्माण करत आहेत, असं यावेळी बावनकुळे म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, ठाकरे यांच्या काळात मराठा आरक्षणाची मांडणी योग्य झाली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं. ठाकरे गट मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे की नाही ते माहीत नाही. पण कालच्या बैठकीत सर्व पक्षीय खासदार होते. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत तसंच धनगर समाजाची बैठक आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. त्यात योग्य निर्णय होईल. त्यांना ही न्याय मिळाला पाहिजे, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले.
विरोधी पक्षाचे बॉम्ब फुसके : रोहित पवार यांच्याबद्दल काय बोलावं त्यांना पण वाटतं आम्हाला संधी मिळेल. शरद पवार साहेबांचा वारस मीच आहे, असं त्यांना वाटत असेल. त्यात जास्त मी बोलणार नाही. ज्या बाबी होणार नाहीत त्या बाबी शोधून काढल्या जात आहेत. नवीन निर्णय नाही. विरोधी पक्ष नेहमी बॉम्ब तयार करतात आणि त्यांचे बॉम्ब फुसके निघतात, असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.
पवारांनी पडळकरांना माफ करावे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे बोलले ते संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भाजपा याला कधीच पाठीशी घालणार नाही. कुणाशीही कितीही मनभेद असेल तरी असं करु नये. आमच्या संस्कृतीत ते बसत नाही. मी पण दिलगिरी व्यक्त करतो. अजित पवारांना विनंती करतो की, त्यांनी मोठ्या मनाने पडळकरांना माफ करावं. ते एक जबाबदार आमदार आहेत. भाजपा कधीही विरोधात असो, पण ते कुठल्याही नेत्याबद्दल वादग्रस्त विधाने करत नाहीत. अजित पवारांचे मन दुखावले असेल तर मी स्वतः माफी मागतो, असे यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा:
- Udhaynidhi Stalin : 'आदिवासी आणि विधवा असल्यामुळंच राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हतं'
- BMC Khichdi Scam Case : कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी
- Muslim Reservation : ...तर आमच्याकडंही 'जरांगे पाटील' आहेत; मुस्लिम आरक्षणावरून 'एमआयएम'आक्रमक