पुणे (बारामती) - ऊस व इतर बागायती पिकांचा तालुका अशी बारामती तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील साबळेवाडी येथील शेतकरी विनोद लक्ष्मण गुळुमकर यांनी आपल्या शेतीत नवीन प्रयोग केला आहे. त्यांनी रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. विनोद यांची प्रगती पाहून साबळेवाडी गावातील अनेक शेतक-यांनी देखील रेशीम शेती करण्यास सुरुवात केली आहे. साबळेवाडी गावातील रेशीम शेती राज्यातील इतर शेतक-यांना प्रेरणा देणारी आहे.
बारामती तालुक्यातील साबळेवाडी हे छोटेसे गाव आहे. शेतीवरच गावाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. साबळेवाडी गावातच विनोद गुळुमकर यांची शेती आहे. गुळुमकर हे २००६ मध्ये शेतीपूरक व्यवसायाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना बारामती कृषी विज्ञान केंद्रातून 'राष्ट्रीय कृषी विकास योजने'अंतर्गत प्रयोग म्हणून तुतीचे बियाणे खरेदी केले. कृषी विज्ञान केंद्रातील अधिका-यांनी त्यांना रेशीम उद्योगाविषयी माहिती दिली. प्रथम २० गुंठ्यात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. २० गुंठ्यांच्या रेशीम शेतीतील यशानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. याच रेशीम व्यवसायाला वृद्धींगत करण्याचा त्यांनी निश्चिय केला. २० गुंठ्यात सुरू केलेली रेशीम शेती त्यांनी अडीच एकरापर्यंत वाढवली.
शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळावे -
महाराष्ट्रात कोष विक्री केंद्र नसल्यामुळे विनोद यांना बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातूनच कोषांची विक्री करावी लागत असे. तिथे प्रति किलो १२० रुपये भाव मिळत असे. २०१० मध्ये विनोद यांना रामनगर, बंगळुरूतील आंतरराष्ट्रीय कोष बाजारपेठेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्पादनाची विक्री बंगळुरूला येथे केली. तिथे प्रति किलो ३०० ते ३५० रुपये असा दर मिळू लागला. मात्र, मार्केटचे अंतर जास्त असल्याने वाहतुकीचा खर्च वाढत होता. पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने बारामती येथे रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्र सुरू झाले आणि बाजारपेठेचा प्रश्न सुटला. विनोद गुळमकर यांच्या अडीच एकरच्या लागवडीत त्यांना एक एकरमध्ये दोन महिन्याला एक बॅच मिळते. एका बॅचमध्ये २०० ते २५० किलो कोष असतात. इतर खर्च वजा करून त्यांना एकरी ३ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. रेशीम उद्योगातून महिन्याकाठी चांगला आर्थिक लाभ मिळत असल्याने गुळुमकर यांचे पूर्ण कुटुंबच आता रेशीम उद्योग करू लागले आहे. तुतीला पाणी कमी लागत असल्यामुळे जिथे पाणी कमी आहे, अशा ठिकाणी देखील हा उद्योग करता येऊ शकतो. शिवाय या उद्योगापासून प्रत्येक महिन्याला शाश्वत उत्पन्न मिळत असल्यामुळे अधिकाधिक शेतक-यांनी या उद्योगाकडे वळले पाहिजे, असे आवाहन विनोद गुळुमकर यांनी केले आहे.
- शेतकऱ्याकडे किमान अर्धा एकर, पाण्याचा निचरा होणारी व बारमाही पाण्याची सोय असलेली जमीन असावी. तुती लागवड, किटक संगोपन साहित्य व पक्के आदर्श किटक संगोपन गृह बांधण्याची क्षमता असावी.
- शेतकरी प्रकल्प/समुहातील असावा. पात्र शेतक-याला एक एकर तुती लागवडीसाठी पाचशे रुपये नोंदणी फी जमा करावी लागते.
- तुती लागवड व संगोपनाच्या कामाची क्षेत्र मर्यादा ०.५ एकर ते १ एकर आहे.
रेशीम उद्योग उभारणीसाठी प्रति एकर सुरुवातीचा भांडवली खर्च -
- लागवडीसाठी ३५ हजार ते ४० हजार रुपये
- कच्चे शेड उभारणी (५०x२० फुट) ५० हजार रुपये आणि पक्क्या शेडसाठी २ लाख रुपये.
- किरकोळ साहित्यासाठी १५ ते २० हजार रुपये. हा खर्च हा एकदाच करावा लागतो व त्याचा उपयोग पुढील १२ ते १५ वर्षांसाठी होतो.
रेशीम उद्योगाची वैशिष्ट्ये - - रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळते.
- एकदा लागवड, संगोपन गृह व साहित्य खरेदी केले की, १२-१५ वर्षे पुन्हा-पुन्हा खर्च करण्याची गरज नाही.
- इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते.
- रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेला किटकनाशके, बुरशीनाशके, इ. फवारणीचा खर्च वाचतो.
- अळ्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या व फॅट्सच्या प्रमाणात वाढ होते.
- पाला उरल्यास त्यापासून मूरघास बनविता येतो. हा मूरघास शेळयांसाठी किंवा दुभत्या जनावरांसाठी वापरल्यास रेशीम उद्योगासह दुग्ध व्यवसाय करता येतो.
- संगोपनातील कचरा, काड्या, अळयांची विष्ठा खाऊन राहिलेला पाला कुजवून चांगले खत तयार होते. या खतात गांडूळ सोडल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खतही मिळते. तुती काड्यांचा उपयोग जळणासाठीही करता येतो.
- घरातील महिला व वृदध व्यक्ती आपली कामे संभाळून हा उद्योग सुरू करु शकतात.
- रेशीम अळयांना पुरेशी जागा व पोषक खाद्य दिल्याने स्वत:च्या उत्पन्नाची प्रत समजू शकते. कारण पाचव्या अवस्थेला चौथ्या किंवा पाचव्या दिवशी १० अळयांचे वजन ५०ते५५ ग्रॅम भरले की उच्च प्रतीचे कोष तयार होणार हे शेतक-यांना घरी बसून समजते.
- बारामती कोष खरेदी-विक्री मार्केटमध्ये कोष विक्री केल्यास व एक किलोला ३०० रुपये दर मिळाल्यास प्रति किलो ५० रुपये अनुदान दिले जाते.
- कोषापासून धागा काढून त्यापासून कापड तयार करणे हा मुख्य उद्देश असला तरी कमी प्रतीच्या कोषापासून बुके, हारही तयार करता येतात.
रेशीम उद्योगासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती - - शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. वेळोवेळी प्रत्यक्ष बागेला भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करुन शेतक-यांना मार्गदर्शन केले जाते.
- मोफत अभ्यास दौरे आयोजित करून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाविषयी माहिती करून दिली जाते.
- शासनामार्फत ७५ टक्के सवलतीच्या दरात अंडीपुंजाचा पुरवठा करण्यात येतो.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. सन २०२०-२१ मध्ये एक एकरसाठी ३ लाख २३ हजार ७९० रुपये इतके अनुदान ३ वर्षात विभागून दिले जाते. किटक संगोपन गृहासाठी एका वर्षात ९९ हजार ७४४ रुपये अनुदान दिले जाते.
२०१७ मध्ये विनोद गुळुमकर यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ९२ हजार रुपयाचे अनुदान भेटले होते. त्यामधून ते त्यांचा रेशीम उद्योग अधिक कसा वाढेल याकडे लक्ष देत आहेत. रोजगार हमी योजनेतून लाभ मिळण्यासाठी गुळुमकर यांना तहसीलदार विजय पाटील, सहायक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती रोहन पवार आणि अमोल सोनवणे यांचे सहकार्य मिळाले.