पुणे - लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन जणांना बारामती न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. बारामती तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन दरम्यान विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या आणि सूचनांचे पालन न करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली आहे.
अफजल बनीमिया अत्तार( वय 39 रा.श्रीरामनगर ता.बारामती), चंद्रकुमार जयमंगल शहा( वय 38 रा. सूर्यनगरी ता.बारामती), अक्षय चंद्रकांत शहा (वय 32 रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) अशी या आरोपींची नावे आहेत. तिघांना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा पाचशे रुपये दंड अशी शिक्षा दिली आहे.
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना भविष्यकाळात चारित्र्य पडताळणीमध्ये शिक्षा झाली म्हणून कोणत्याही शासकीय आणि खासगी नोकरीला मुकावे लागणार आहे. या व्यतिरिक्त पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाना मिळवताना अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. आपल्या एका चुकीमुळे भविष्य हे अंधारात जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घरात बसून गांभीर्याने लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले.