बारामती - बारामती शहर पोलिसांनी अवैद्य धंदे व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी धडक कारवायांचे सत्र अवलंबले असून कारवायांचा सिलसिला सुरु आहे. (Baramati city police action) नुकतेच शहरातील पाटस रस्त्यावरील देशमुख चौक येथे उत्तर प्रदेशातील बनू हुकुमचंद यादव याला बेकायदा पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. या अगोदरही पोलिसांनी मध्यप्रदेशातील प्रताप अमरसिंह पवार यांच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे हस्तगत केली आहेत.
अवैद्य धंद्यावाल्यावर कारवाईचे सत्र सुरू ठेवले
मागील चार महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून गुटखा, जुगार, हातभट्टी दारू अशा अवैद्य धंद्यावाल्यावर कारवाईचे सत्र सुरू ठेवले असून चोऱ्या, घरफोड्या, मोटरसायकल चोरी आधी गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
शहरातील गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत पोलिसांनी गुडघ्यासह 10 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मोटरसायकल चोरास अटक केली असून अनेक अवैद्य गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करून दोन टेम्पोसह पाच लाखांचे धान्य जप्त केले आहे. तर, एक रेशन दुकान सील केले आहे.
71 गुन्ह्यांची घट
क्राईम रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून सध्या गस्त वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हे घडण्यास आळा बसत आहे. गस्त वाढविल्याने मागील वर्षीच्या तुलनेत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 71 गुन्ह्यांची घट झाली आहे.
485 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 485 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई तर एका आरोपीवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शहरातील एका महिला सावकारावर कारवाई करत जबरी चोरीचे 15 पैकी 12 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.
हातावरील टॅटू वरून गुन्हा उघडकीस
एका अज्ञात व्यक्तीने शहरातील एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना केवळ त्याच्या हातावरील टॅटूवरून पोलिसांनी मोठ्या कौशल्याने गुन्हा उघडकीस आणला. तसेच शहरातील कसबा येथे शांत डोक्याने एका महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे.
आत्तापर्यंत दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अवैद्य व्यवसायासह अन्य गुन्हे रोखण्यासाठी शहरात गस्त वाढवून कारवायांमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे. गावठी दारू बनवणाऱ्यावर गुन्हे दाखल करून सत्र न्यायालयात केस चालवणार. आत्तापर्यंत दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
हेही वाचा - युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल