पुणे - बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक माने यांनी कार्यकर्ते व पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने त्यांची अर्ध नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. यावेळी बसपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
बारामती विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक माने यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना मतदानाच्या चार दिवस आधीच पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. माने यांनी केलेल्या कृतीची बसप पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यांची पक्षातून हाकालपट्टी केल्याचे पत्रक जाहीर करण्यात आले.
माने यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा आरोप पक्षाने याआधी केला होता.
या प्रकरणाबाबत सविस्तर विचारल्यावर, राष्ट्रवादीचे व बसपचे ध्येय-धोरणे वेगळे असून, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे बसपचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख काळूराम चौधरी यांनी पत्रक काढून जाहीर केले.
माने यांनी पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता परस्पर पाठिंब्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या असंतोष निर्माण झाला होता. या संतापातून माने यांना अर्धनग्न करत त्यांच्यावर शाई फेकून त्यांची धिंड काढण्यात आल्याचे कळते .
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.