बारामती (पुणे) - उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या नगररचनाकारसह संचालक हनुमंत नाझीरकर यांचा मुलगा भास्कर नाझीरकर याला खेड शिवापूर टोल नाक्यावरून बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारामती जिल्हा सत्र न्यायालयात भास्कर नाझीरकर याला हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे,अशी माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने भास्कर नाझीरकरचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी हनुमंत नाझीरकर यांची मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर, मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर (रा. स्वप्नशिल्प अपार्टमेंट, कोथरूड, पुणे) व हेमंत प्रल्हाद पोंद्कुले (पत्ता माहीत नाही) या तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत संग्राम तानाजी सोरटे (रा. मगरवाडी ता. बारामती) यांनी तक्रार दिली.९ डिसेंबर २०१९ ते २६ जून २०२० या कालावधीत बारामतीत विद्युत मंडळाच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार व त्याचा भाऊ प्रवीण यांच्या नावे बनावट नोटरी भाडे करार व भाडेपट्टा तयार करत ती खरी आहे, असे भासवून नाझीरकर व पोंदकुले यांनी ती कागदपत्रे बारामतीतील विद्युत मंडळ कार्यालयात दाखल केली. विद्युत पुरवठा कायम राहावा म्हणून त्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. प्रवीण यांच्या नावे बनावट भाडेपट्टा तयार करत विद्युत मंडळाविरुद्ध मनाई मिळावी, यासाठी तो बारामती न्यायालयात वापरण्यात आला होता. याप्रकरणी तिघांविरोधात भादवि कलम ४६७, ४७१, ४७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत.