पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पन्नास जणांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळा करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, वारकरी या ठिकाणी येऊन तुकाराम बीज सोहळा उद्या (दि. 30 मार्च) साजरा करण्याचा निर्णय बंडातात्या कराडकर यांनी घेतला आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन केल्यास योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.
प्रशासनाने आडविल्यास भजन सत्याग्रह करू
देहूगावच्या वेशीवर बंडातात्या कराडकर पोहोचले असून काही वेळातच ते वारकाऱ्यांसह आंदोलन करणार आहेत. यावेळी प्रशासन किंवा पोलिसांकडून अडवणूक झाल्यास त्याच ठिकाणी भजन सत्याग्रह करू, असा इशारा बंडातात्यांनी दिला आहे. त्याचबरोबर निवेदन देऊन ते परत जाणार असल्याचेही देखील त्यांनी म्हटले आहे.
आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार
माझी वयक्तिक भूमिका असूनही वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. आज (दि. 29 मार्च) चार वाजण्याच्या सुमारास आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे बंडातात्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहूच्या वेशीवर मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावे, मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिले आहेत. इतर वारकऱ्यांनी देखील घरात बसून भजन करत बीज सोहळा साजरा करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हेही वाचा - ...अन् ट्रकवर उभारले चालते फिरते मंगल कार्यालय