पुणे - नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना मदत करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली.
गुन्ह्यातील दोघांना अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे पाच लाख रुपयांची मागणी करणारे अर्जून घोडे (सपोनि),धर्मात्मा हांडे अशी लाच मागणा-या पोलीसांची नावे आहेत.
अर्जुन घोडे हे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक, तर धर्मात्मा हांडे हे पोलीस कर्मचारी पदावर कार्यरत आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पोलीस कर्मचा-याला मध्यस्थी ठेवून तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हात मदत करणे व दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करून याच गुन्ह्यातील इतर दोघांना अटक न करण्यासाठी पाच लाखांची मागणी करत होते. हा सर्व प्रकार व्हॉट्सअॅप कॉल वरून होत होता. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदार यांच्या समोर पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यातील व्हॉट्सअॅप संवादावरून रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, पोलीस हवालदार टिळेकर, शिपाई थरकार, पोलीस शिपाई महाशब्दे यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली आहे.