पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आता संपली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार? यावर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते.
कोणाला उमेदवारी देणार :आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, नगरसेवक धीरज घाटे आणि नगरसेवक हेमंत रासने हे उस्तुक होते. अखेर शनिवारी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. हेमंत रासने यांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आत्ता महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. कसबा पोटनिवडणूक काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसकडून नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर हे उत्सुक आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
एकत्र काम करणार : रवींद्र धंगेकर हे चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. दोन वेळा त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली आहे. रवींद्र धंगेकर यांनी याआधी देखील कसबा मतदार संघात गिरीश बापट यांच्या विरोधात मनसेकडून निवडून लढवली आहे. आत्ता ते काँग्रेसमध्ये असल्याने रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने ही लढत होणार असल्याचे सांगितले जाते आहे. गेल्या अनेक वर्षापासून कसबा मतदार संघातील विकास कामांना ब्रेक लागला आहे. तो ब्रेक आता तोडण्याचा काम मी करणार आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार आहे. ही जागा महविकास आघाडी सरकारच जिंकणार असल्याचा दावा रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
यांच्या निधनामुळे निवडणूक : कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे अल्पशा आजाराने 22 डिसेंबर रोजी निधन झाले होते. टिळक या भारतीय जनता पक्षाकडून 4 वेळा नगरसेवक, एकदा महापौर तसेच सध्या आमदार म्हणून कार्यरत होत्या. मुक्ता टिळक यांना टिळक घराण्यातील पहिल्या महापौर होण्याचा मान मिळाला होता. त्यांनी 2019 मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे.