पुणे : अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख सांगणारी वारी ही महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये 300 वर्षापासून सर्वधर्मसमभावाची शिकवण देते. वारकरी संप्रदाय हाच पहिला संप्रदाय ज्याने सर्वधर्मसमभावाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात केली. परंपरा आजही सुरू आहे. त्यातल्या त्यात आषाढी वारीचा उत्सव हा महाराष्ट्रासाठी एक आनंद पर्वणी असतो. आपले काहीतरी योगदान राहावे असे प्रत्येकाला वाटते. त्याच दृष्टीने पुण्यातील काही मुस्लिम रिक्षा चालकांनी सर्वधर्मसमभावाचा आदर्श घेत, वारीत येणाऱ्या अपंग आणि महिला वारकऱ्यांना मोफत रिक्षा सेवा देऊन सर्वधर्मसमभावाचा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
सेवेचे भाग्य मिळण्यासाठी मोफत रिक्षा सेवा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान केल्यानंतर, दुसरा मुक्काम पुण्यात असतो. पुण्यात दोन दिवस पालखी असते. पुणेकर ही मोठ्या आस्थेने त्या पालखीचे दर्शन घेतात. मात्र अचानक जास्त चालल्यामुळे या वारकरी दिंडीमध्ये अनेक, वृद्ध व्यक्ती, महिला, अपंग, असतात. त्यांच्या चालण्याचा त्रास कमी व्हावा आणि त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्यालाही थोडंसे मिळावे या उद्देशाने काही मुस्लिम बांधवांनी मोफत रिक्षा सेवा देण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून अखंड सेवा सुरू आहे. पालखी जोपर्यंत पुण्याच्या बाहेर मार्गस्थ होणार नाही, तोपर्यंत आम्ही ही सेवा करत राहणार असल्याचे या रिक्षा चालकाने सांगितले आहे.
सोशल मीडियावरून पसरवली जाते भीती : महाराष्ट्रात सध्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. कोल्हापूर सारखा प्रकार झाल्यानंतर, मुस्लिम बांधवांमध्ये भीतीची वातावरण असल्याचे बोलले जाते. ही सगळी भीती आहे ती सोशल मीडियावरून पसरवली जात आहे. त्यासाठी सर्वांनी पोस्ट करताना काळजी घ्या, वाचताना, कृती करताना सुद्धा काळजी घ्यावी लागेल, अशी भावना सुद्धा या मुस्लिम रिक्षा चालकांनी यावेळी व्यक्त केली आहे.
माणुसकीचा धर्म सगळ्यात मोठा : जात वेगळा नाही आमचा धर्म वेगळा नाही, या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण या पालखीमध्ये आपला खारीचा वाटा उचलत आहे. पुण्यातील पोलीस लाईन शिवाजीनगर येथे सुद्धा मुस्लिम बांधवाकडून दरवर्षी न चुकता वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर इतर साहित्य सुद्धा पुरवले जाते. त्यामुळे पुणे ज्याप्रमाणे सांस्कृतिक शहर आहे, तसेच सर्वधर्म समभावाची ओळख असणारे शहर आहे. जात आणि धर्म यापेक्षा माणुसकीचा धर्म मोठा असल्याचे यातून या रिक्षाचालकांनी दाखवून दिले आहे.
अखंड सेवा देण्याचा करणार प्रयत्न : वारकरी जेव्हा आमच्या गाडीमध्ये बसतो, उतरल्यानंतर तो तू सुखी रहा, तुला सर्व सुख मिळो अशी भावना व्यक्त करतो. तेच सर्वात मोठे आमच्यासाठी समाधान असते. त्याच समाधानातून चांगली झोप लागत असल्याचा अनुभव या रिक्षाचालकांनी व्यक्त केला. यापूर्वी आम्ही सेवा दिली नाहीं तर यावर्षीपासून या सेवेमध्ये सहभागी होताना मनापासून आनंद होत आहे. ही सेवा अखंड देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहणार अशी प्रतिक्रिया या रिक्षाचालकाने दिलेली आहे.
व्यवस्थापन शास्त्रामध्ये करावा अभ्यास : आषाढी दिंडी सोहळा हा खरंतर आळंदी ते पंढरपूर असतो. जवळपास 35 ते 36 दिवसाचा हा प्रवास असतो. परंतु सुरुवातीलाच अशी आधार देणारी माणसे वारकऱ्यांना जागोजागी मिळत असतात. त्यामुळेच तीनशे वर्षानंतर सुद्धा या दिंडीचे अस्तित्व टिकून आहे. जगामध्ये व्यवस्थापन शास्त्रामध्ये याचा अभ्यास करावा असे अनेक तज्ञांना वाटते. त्याचे कारण तीनशे वर्षांपूर्वी दिलेला संदेश आजही जिवंत ठेवण्यात हा महाराष्ट्र यशस्वी झाला आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारी माणसे या सेवेत कार्यरत असतात, हे त्याचे कारण असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सगळ्या धर्माचा, सगळ्या पंथांचा : एकीकडे महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडत चालल्याचे दिसत आहे. नुकतीच कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठी दंगल झाली. महाराष्ट्रात धार्मिक वातावरणातून ध्रुवीकरणाचा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु या सगळ्यामधून महाराष्ट्र हा सगळ्या धर्माचा सगळ्या पंथांचा आणि सर्वधर्म समभावाचा असल्याचे या रिक्षा चालकाने दाखवून दिला आहे.
हेही वाचा -