पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर जमीन फसवणूकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. दिव्यांग महिला व बांदल यांच्या मित्राच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात राजकारणात मंगलदास बांदल वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. शिरुर लोकसभा मतदार संघात ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार म्हणुन होते. मात्र, ऐनवेळी त्यांची संधी नाकारली अन् बांदलांना निवडणूक निकालानंतर ग्रहणच लागले. तर्डोबाची वाडी येथे २००८ साली त्यांनी आशा पाचर्णे या महिलेशी १० एकर जमिनीचा ९० लाख रूपयांना व्यवहार केला. मात्र, जमीन मालक महिलेला पैसेच दिला नाही. त्यामुळे ८ जुलैला शिरुर पोलिसांत त्यांच्याविरुद्ध जमीन फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला.
बांदल यांच्या अडचणीत दुसऱ्या गुन्ह्याची सोमवारी भर पडली आहे. बांदल यांनी पुणे-नगर महामार्गालगत २००१ साली खंडाळे गावच्या हद्दीत किशोर देशमुख यांची २१ गुंठे जमिनीचा २७ लाख रूपयांना व्यवहार केला. ती जमीन त्यांनी आपल्या मित्राच्या नावे खरेदी केली. परंतु, बांदल यांनी जमीन मालक देशमुख यांना वारंवार पैसे देतो असे सांगून टाळाटाळ करत ७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप दुसऱ्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.
मात्र, दोन्ही गुन्ह्यांमध्ये माझा थेट संबंध नसून राजकीय सुडापोटी माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. मी जनतेतून घडलेला कार्यकर्ता आहे, असे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहत असणाऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने टोळी रुपात सक्रिय होऊन दमदाटी करुन फसवणूक केली जात असेल तर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा संकेत पोलीस अधीक्षक संदीप यांनी दिले आहे.
दरम्यान, एकाच तालुक्यात राजकीय नेत्यावर दोन ठिकाणी जमीन फसवणूकीचे गुन्हे दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.