पुणे - लॉकडाऊन काळामध्ये आलेले वाढीव बिल माफ होणार नाही, तसेच हे बिल भरावे लागेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे. मात्र, यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे.
लॉकडाऊन काळातील आहेत वाढीव बिले -
एप्रिल महिन्यापासून वीज बिलांचा घोळ सुरू आहे. लॉकडाऊन काळामध्ये अनेकांना वीज बिल भरता आलेले नाही. काहींनी ऑनलाइन बिल भरले. मात्र, त्यांनादेखील दुप्पट-तिप्पट बिल महावितरणकडून पाठवण्यात आले आहे. एकंदरीतच सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन काळात भरमसाठ बिल आल्याने सर्वसामान्यांचे डोळे चक्रावले आहे. यामुळे हे वाढीव बिल माफ केले जाते, अशी सर्व सामन्यांची भावना आहे.
हेही वाचा - लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध, असा होणार परिणाम
याचसोबत लहान मोठ्या व्यावसायिकांनाही भरमसाठ वीज बिल आले. घरगुती वापराचे बिल पाच हजारांपासून 10 ते 15 तर काही जणांना 20 हजारापर्यंत आल्याने नागरिकांना धक्का बसला आहे. या वीज बिलाबाबत महावितरणच्या कार्यालयात जावे तर त्या ठिकाणी अधिकारी अरेरावीची भाषा बोलतात. बिल भरले नाही तर लाईट, मीटर काढून नेऊ, अशी धमकी देत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
सुरुवातीला लॉकडाऊन काळात आलेले वाढीव बिल माफ केले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, महावितरणच्या कार्यालयात गेल्यावर नागरिकांना वेगळाच अनुभवाला सामोरे जावे लागते आहे. आता तर ऊर्जामंत्र्यांनी बिल भरावे लागेल, असे सांगितल्याने सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.