पुणे - स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले राजगडावर सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत गडावरील पाण्याचे टाके, पडझड झालेल्या जुन्या अवशेषांची साफ सपाई करण्यात आली. यावेळी गडावर जुन्या ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या हाती लागला आहे.
स्वच्छता मोहीम राबवित असताना काही ऐतिहासिक नाणी, ब्रिटिशकालीन नाणी, तलवारीचे अर्धे पाते, जात्याचा तुकडा, लोखंडी तोफगोळा, दगडी तोफगोळा व काही तुटलेले लाकडी वस्तूंचे भाग सापडले आहेत. तसेच एक देवीची रेखीव प्रतिमा देखील सापडली आहे.
या स्वच्छता मोहिमेध्ये सापडलेली नाण्यामध्ये पेशवे कालीण सहा नाण्यांचा समावेश आहे. त्यास शिवाराई( दुदांडी) म्हणून ओळखले जात असल्याचे इतिहास अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. याच बरोबर गडावर १८३४ ते १९४४ काळातील १४ ब्रिटिशकालीन नाणीही सापडली आहेत.
धोप तलवारीचे पाते
राजगडावरील या स्वच्छता मोहिमेळी तलवारीचे अर्धेपाते दुर्गसेवकांच्या हाती लागले आहे. या पात्याचे निरिक्षण केले असता, हे पाते युरोपियन पद्धतीचे असून पोर्तुगाल देशातून ही तलवार मराठी मुलखात आली असल्याची शक्यता इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. ही तलवार धोप प्रकारात मोडत असून तलवारीवर काही साकेतिक चिन्हे कोरलेली दिसून येत आहेत.
दुर्गसंवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानकडून दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली होती. यात एकूण ११० दुर्गसेवकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, राजधानी राजगडावर स्वच्छता मोहीम राबवित असताना मिळालेल्या सर्व वस्तू पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्या वस्तूंचा विभागाकडून व संशोधकांकडून सखोल अभ्यास केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.