पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू असवानी तर शिवसेनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पिंपरीमध्ये मतदान कमी व्हावे यासाठी दहशत माजवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोप डब्बू असवानी यांनी केला आहे. तर शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी राष्ट्रवादीला पराभव दिसत असल्याने त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने परस्पर विरोधी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा - मतदानाची सुट्टी जाहीर; मात्र, सफाई कर्मचारी 'ऑन ड्यूटी', मतदान करणे बनलेय अवघड
पिंपरीमधील माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक डब्बू असवानी यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत स्वतः असवानी किरकोळ जखमी झाले असून शिवसेनेतील तीन जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी डब्बू असवानी यांच्या कार्यालयाच्या बाहेर काही जण संशयितरित्या फिरत होते. काही वेळाने अज्ञात टोळक्याने डब्बू असवानी यांच्यावर हल्ला चढवला. तेव्हा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात असवानी यांचे भाऊ आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली असून शिवसेनेचे तीन जण जखमी आहेत. यातील दोन गंभीर जखमी असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.
"डब्बू असवानी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. आमचे पाच कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दहशतीचे राजकारण राष्ट्रवादीने सुरू केले आहे. त्यांना पराभव दिसत आहे. आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले नाहीत" अशी प्रतिक्रिया गौतम चाबुकस्वार यांनी दिली.
हेही वाचा - मतदान करण्याचे शर्मिला ठाकरेंचे आवाहन; ठाकरे कुटुंबीयांनी केले मतदान