पुणे - सद्या सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती आहे. भाजपच्या मंत्र्यांना या परिस्थितीचे गांभीर्य नसून, यावेळी ते फोटो शूट करत असल्यास त्यांची मंत्रीपदावर राहाण्याची योग्यता आहे का, असा सवाल शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
चार दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्री पूरग्रस्त भागात पोहोचत असतील, तर हे दुर्दैवी आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना खासदार कोल्हे यांनी लक्ष्य केले आहे. जुन्नर मधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ब्रम्हनाळच्या दुर्घटनेतील आजी आणि मुलाचा फोटो हे काळीज हालवून टाकणारं चित्र आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. ही घटना म्हणजे सरकारच्या निष्क्रियतेचा भेसूर चेहरा असल्याचे त्यांनी म्हटले.
सध्या शिवस्वराज्य यात्रा थांबवली असून, पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी 'एक भाकर पुरग्रस्तांना' हे अभियान सुरू करत असल्याची माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.