पुणे - छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी तुळापूर येथे हजेरी लावली. मात्र, यामध्ये विशेष चर्चा झाली ती शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भेटीची. निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असताना एकमेकांचे विरोधक एकत्र आल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढली होती.
बलिदान दिनासारख्या पवित्र दिवशी कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यास डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी नकार दिला. यावेळी पालकमंत्री गिरिष बापट हेही उपस्थित होते, त्यांनी अमोल कोल्हे यांच्या गालावरून हात फिरवला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
वढू बुद्रुक येथील बलिदान स्थळालाही शिवाजीराव आढळराव-पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांनी विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले, आपण या पवित्र स्थळावर आलो ते फक्त संभाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी. हे स्थान इतके पवित्र आहे, की येथे कोणताही राजकीय हेवादेवा नसावा, असे म्हणत राजकीय प्रश्नांवर बोलणे त्यांनी टाळले. तर आढळराव यांनीही राजकीय स्थितीवर प्रतिक्रिया देणे टाळले.
शिरुर लोकसभा मतदार संघात सेना आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढाई होण्याची चिन्हे आहेत. शिरुरमधून लोकसभेत कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.