पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. शनिवारी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. हिंदू धर्मातील महत्त्वाचा महाशिवरात्री उत्सव शनिवारी 18 फेब्रुवारीला असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विविध कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. पुण्यातील प्रसिद्ध ओमकारेश्वर मंदिरामध्ये आरती करून ओंकारेश्वराचे दर्शन घेतले.
अमित शाह - गिरीश बापट यांची भेट : त्यानंतर ते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला गेले त्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. जुन्या गप्पा झाल्या. सभागृहामधल्या आणि चांगल्या खेळीमिळीत ही भेट झाल्याचे खासदार बापट यांचा मुलगा गौरव बापट यांनी सांगितले आहे. खूप उशीर झाल्यामुळे ते जास्त वेळ गिरीश बापटांकडे थांबले नाहीत. परंतु कसब्याची निवडणूक आणि बापटाने केलेले २५ वर्षाचे नेतृत्व यावर भेट घेणे महत्त्वाचे होते. म्हणून अमित शाह यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. अनेक दिवस गिरीश बापट आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. सगळ्या प्रचारापासून दूर होते. पण कसबा पोटनिवडणुकीसाठी त्यांना ऑक्सिजन आणि व्हीलचेअरवरून मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आल्यानंतर टीका होत होती. परंतु आज स्वतः अमित शाह यांनी या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतलेली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत ओमकारेश्वर मंदिर दर्शन : यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होते. पुण्यात कसबा पोटनिवडणूक होत असून या कसबा पोटनिवडणुकीमधल्या भागामध्ये हे ओमकारेश्वर मंदिर आहे. त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा दर्शन घेणे ही वेळ निवडली आहे. विरोधकांकडून टीका जरी होत असली तरी अमित शाहांच्या या दर्शनाचा किती लाभ आता कसबा पोटनिवडणुकीत होतो हे पाहणे महत्वाचे आहे. नुकतेच कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार हे जाहीर झाले असून भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच खासदार गिरीश बापट यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बापट यांची भेट घेतली आहे.
मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा पहारा : पुणे शहरात दिवसभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अचानक केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताब्यामध्ये एका व्यक्तीने प्रवेश केल्याने सुरक्षेमध्ये त्यानंतर मोठी वाढ करण्यात आली होती. ओंकारेश्वर मंदिराच्या भोवताली पोलिसांचा मोठा पहारा पहायला मिळाला. त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा पोलीस जाण्याची सूचना करत होते.