पुणे- आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पैकेकर व लिपिक राकेश लाडके यांनी गौण खनिज व्यावसायिकाकडे लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीवरून आज सायंकाळच्या सुमारास राकेश लाडके व तहसीलदार सुषमा पैकेकर यांना एक लाख रुपये लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे.
घोडेगाव येथील तहसील परिसरात प्रांताधिकारी संजय पाटील यांनी डबर वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून 2 लाख 41 हजार 50 रुपये दंड आकारला होता. त्यानंतर हा दंड कमी करण्यासाठी तहसीलदार व लिपिक या दोघांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तडजोडीमध्ये एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास राकेश लाडके याने लाच स्वीकारली असून या लाचेची मागणी तहसीलदार सुषमा पैकेकर यांनी केली असल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार लाचलुचपत विभागाने संबंधित गुन्ह्याची नोंद घोडेगाव पोलीस ठाण्यात केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासुन लाचलुचपत विभागातुन महसुल कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, महसुल विभागात अद्यापही सुधारणा होत नसल्याने महसुल विभागाला भ्रष्टाचाराचा विळखा लागला असल्याची चर्चा सुरू आहे.